Book Review: Sardar Vallabhbhai Patel Feature in Saptahik Sakal

सरदार ते एकात्म भारताचे शिल्पकार

विनायक लिमये.

Saturday, January 12, 2013

देश 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला तरी देशासमोरची आव्हाने इतकी अक्राळविक्राळ होती, की ती आव्हाने संपवण्याशिवाय इलाज नव्हता. देशात 565 संस्थाने होती. ही संस्थाने स्वतंत्र राहिली असती, तर देशाला खूप मोठी किंमत मोजावी लागली असती. वल्लभभाई पटेल यांनी हा धोका ओळखून सर्व संस्थाने विलीन करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.


देशाच्या राजकारणात आज जी आव्हाने येथील नेत्यासमोर आणि प्रशासनासमोर उभी आहेत, त्यापेक्षा खूप मोठी आव्हाने स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्याकाळच्या नेत्यांसमोर होती; पण त्यांनी या कठीण प्रश्‍नांवर लीलया मार्ग काढलेच व आपल्यानंतरच्या नेत्यांना आदर्श ठरेल अशी वाट निर्माण करून ठेवली. आपले निर्णय पुढेही आदर्श ठरतील व त्यावरून नंतरच्या नेत्यांना निर्णय घेणे सोपे जाईल, अशी कार्यपद्धती त्यांनी आखून ठेवली होती. अशा काही मोजक्‍या नेत्यांमध्ये ज्या व्यक्तींचा समावेश होतो त्यातील अग्रभागी असलेले नाव म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करून ठेवावी, असे काम सरदार पटेल यांनी केले आहे. देश स्वतंत्र झाला त्या वेळी इंग्रजांनी हा देश एकसंध राहणार नाही, अशी तजवीज केली होती. भारताला स्वातंत्र्य देताना येथील राजांनाही आम्ही स्वातंत्र्य देत आहोत. त्यांना त्यांचा निर्णय घ्यायचा अधिकार असेल, ते भारतात राहू शकतील किंवा पाकिस्तानात जाऊ शकतील अथवा स्वतंत्र राहू शकतील, अशी योजना इंग्रजांनी केली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांनी इंग्रजी सत्तेचा हा कुटील डाव हाणून पाडला. हे सारे त्यांनी कसे साध्य केले ते वाचणे आवश्‍यक तर आहेच; पण हा इतिहास कसा घडवला ते अभ्यासणे गरजेचे आहे. रोहन प्रकाशनाच्या “सरदार वल्लभभाई पटेल ः भारताचा पोलादी पुरुष’ या पुस्तकात पटेल यांच्या आयुष्यातील अनेक अपरिचित गोष्टी समजतात. बलराज कृष्णा या ज्येष्ठ पत्रकाराने हे चरित्र लिहिले आहे. भगवान दातार यांनी या चरित्राचा अनुवाद केला आहे. मराठीत पटेल यांचे चरित्र यापूर्वी प्रसिद्ध झालेले आहे; पण पटेल यांच्या निकटच्या माणसाने हे चरित्र लिहिल्याने पटेल यांची विविध प्रकरणांत नेमकी भूमिका काय होती ते विस्ताराने समजू शकते.
पटेल यांनी जुनागढ आणि भोपाळ, त्रावणकोर व हैदराबाद या संस्थानाच्या विलीनीकरणात जी महत्त्वाची भूमिका बजावली त्याचा तपशील या पुस्तकात विस्ताराने आला आहे. भोपाळचा नबाब भारतात विलीन व्हायला तयार नव्हता, त्याला आपल्या राज्याचे स्वतंत्र अस्तित्व राखायचे होते. ते नाहीच जमले, तर पाकिस्तानात विलीन व्हायचे होते, जीना यांच्यानंतर त्याला पाकिस्तानमध्ये मोठे पद मिळवायचे होते. जुनागढ आणि त्रावणकोर; तसेच भोपाळ या राज्यांना जर वेळीच जरब बसली नसती, तर अन्य संस्थानांच्या प्रमुखांना असाच वेळ मिळाला असता. त्यांना त्यांचे मनसुबे साध्य करता आले असते. पटेल यांनी हे सगळ खुबीने टाळले. जुनागढचा प्रश्‍न त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात जाऊ दिला नाही; तसेच तेथे लष्करी कारवाई करून तो भाग भारतात सामील करून घेतला. या कारवाईवेळी पटेल यांनी माऊंटबॅटन यांनादेखील या कारवाईपासून दूर ठेवले. कारवाईनंतर पटेल यांनी तेथे सार्वमत घेतले व सार्वमत भारताच्या बाजूनेच झाले. अशीच कारवाई त्यांनी काश्‍मीरमध्ये केली असती; पण त्या प्रश्‍नापासून पंडित नेहरू यांनी पटेल यांना बाजूला ठेवले होते. त्यामुळे काश्‍मीरच्या प्रश्‍नाचे त्रांगडे होऊन बसले. जुनागढ प्रश्‍न असो किंवा भोपाळ त्याचबरोबर निजामाच्या कारवायांमुळे संकट ठरलेले हैदराबाद संस्थान असो. या संस्थांनाच्या प्रमुखांना पटेल यांनी राजकीय कौशल्याने भारतात विलीन व्हायला भाग पाडले. त्यावरून त्यांचे नेतृत्व तर सिद्ध झालेच; पण स्वतंत्र भारतासमोर येणारे अनेक प्रश्‍न कायमचे निकालात निघाले.
सरदार पटेल यांनी संस्थानांचा प्रश्‍न मुत्सद्देगिरीने सोडवलाच. दरवेळी त्यांना माऊंटबॅटन आणि इंग्लंडमधील राजकीय विभागाचा मंत्री कोरफील्ड यांच्याशी सामना करावा लागला; पण या सगळ्यांवर त्यांनी हुशारीने मात केली. संस्थाने विलीन करण्याबरोबरच पटेल यांनी आणीबाणीच्या परिस्थितीत श्रीनगरला भेट देऊन पाकिस्तानी टोळीवाल्यांच्या आक्रमणापासून त्याचा बचाव केला. त्या वेळी धुके असल्याने व विमान कधीही पाकिस्तानी हवाई हद्दीत जाण्याची शक्‍यता होती; पण पटेल यांनी धोका पत्करून काश्‍मीरला भेट दिली. श्रीनगर भेटीत त्यांनी लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांना आवश्‍यक मदत त्वरेने कशी मिळेल याकडे लक्ष दिले. पटेल यांच्या दौऱ्यामुळे तेथील सैनिकांचे व अधिकाऱ्यांचे मनोबल वाढले. पटेल यांनी अशा अनेक बाबी आपल्या कार्यकाळात केल्या. चीनच्या मुद्द्यावरूनही त्यांनी नेहरूना इशारा दिला होता. पटेल म्हणत होते तेच शेवटी खरे झाले, मग ते पाकिस्तानसंदर्भात असो की चीनबाबत.
पटेल यांनी आयुष्यात जे जे ठरवले ते ते केले. पटेल यांच्यामध्ये लहानपणापासूनच नेतृत्वगुण होते. शाळेत असताना एका विद्यार्थ्याला फीच्या मुद्द्यावरून एका शिक्षकांनी अकारण मारहाण केली. पटेल यांनी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबून त्या शिक्षकावर कारवाई करण्यास भाग पाडले होते. त्याचबरोबर शालेय साहित्य विक्री करण्यासाठी एक शिक्षक विद्यार्थ्यांवर दबाब आणत असत. पटेल यांनी त्यांच्याविरुद्ध आवाज उठवला. पटेल यांच्या या पवित्र्याने त्या शिक्षकाने आपला व्यवसायच गुंडाळला; पण हेच पटेल आपल्या चांगल्या शिक्षकांबद्दल अत्यंत नम्र होते. देशाच्या उपपंतप्रधानपदी निवडले गेल्यानंतर ते अहमदाबाद येथे आले असताना त्यांचे एक शिक्षक त्यांना भेटायला येणार होते. पटेल यांना हे कळल्यावर ते स्वतःच त्यांना भेटायला निघाले. रस्त्यातच त्यांची गाठ पडली, पटेल यांनी रस्त्यातच त्यांना खाली वाकून नमस्कार केला.
पटेल यांनी महात्मा गांधी यांच्याबरोबर काम करायला लागण्यापूर्वी वकिलीची परीक्षा दिली होती, त्याचबरोबर त्यांनी निष्णात फौजदारी वकील म्हणून लौकिक मिळवला होता. बॅरिस्टर होण्याचे त्यांचे ध्येय होते, ते त्यांनी प्रचंड कष्ट घेऊन साध्य केले. त्यासाठी त्यांनी वकिली करताना मिळालेले पैसे साठवून वयाच्या पस्तिसाव्या वर्षी इंग्लडंला प्रयाण केले. तेथेही त्यांच्यासमोर कष्ट होतेच. पुस्तके घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसै नव्हते. होस्टेलमध्ये राहत असलेले पटेल अभ्यासासाठी सार्वजनिक ग्रंथालयात जात. हे ग्रंथालय त्यांच्या होस्टेलपासून 10 ते 12 मैल लांब होते. पटेल तिथपर्यंत चालत जात आणि चालत येत. बॅरिस्टर ही पदवी मिळाल्यावर त्यांनी मुंबईत वकिली न करता बोरसाड आणि आणंद येथे वकिली केली. त्यानतंर त्यांनी अहमदाबाद पालिकेच्या राजकारणात प्रवेश केला. त्या वेळच्या इंग्रजी अधिकाऱ्यांना आपल्या पदाचा व सत्तेचा गर्व होता; तसेच नागरिकांबद्दल व लोकप्रतिनिधींबद्दल प्रचंड तिरस्कार होता, त्यांना ते कस्पटासमान वागवत असत. पटेल यांनी आपल्या वकिली ज्ञानाचा वापर करत या अधिकाऱ्यांना व त्या वेळच्या इंग्रजी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सनदशीर मार्गाने धडा तर शिकवलाच; पण लोकप्रतिनिधींचे महत्त्व मान्य करायला लावले. शिक्षण, पाण्याचा प्रश्‍न आणि स्वच्छता या तीन बाबतींत त्यांनी आदर्श वाटावे असे काम केले.
शेतसारा भरण्याच्या आंदोलनाची सुरवात पटेल यांच्या खेडा जिल्ह्यापासूनच झाली. याच आंदोलनाच्या काळात पटेल यांचा गांधीजींशी जवळचा संपर्क आला. गांधीजींनी या आंदोलनाची सर्व सूत्रे पटेल यांच्याकडे सोपविली होती. खेडा सत्याग्रह यशस्वी झाला आणि पटेल यांचे नेतृत्व प्रस्थापित झाले. या आंदोलनाने गांधी आणि पटेल यांच्यात जवळीक तर निर्माण झालीच; पण गांधीजींनी त्यांना आपल्या लढ्याचे उपसेनापतिपद बहाल केले. पटेल यांनी गांधीजींना आपले नेते मानलेच होते. ते त्यांच्यावर प्रचंड माया करत. दोघांमध्ये थट्टाविनोदही चालत. गांधीजींवर त्यांची श्रद्धा होती त्यामुळे त्यांचा एखादा निर्णय पटला नाही, तरी तो निर्णय ते विनातक्रार स्वीकारत असत. जवाहरलाल नेहरू यांच्याबाबतीतही गांधीजींनी त्यांच्याकडून वचन घेतले होते ते त्यांनी आयुष्यभर पाळले. नेहरू यांना मी नेता मानेन असे वचन त्यांनी दिले होते.
प्रशासनावर पकड असलेला हा नेता केवळ नियम आणि कायदे यांच्या जंजाळात अडकून पडणारा नव्हता. प्रशासनाला मानवी चेहरा देण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्याचबरोबर “आयसीएस’ या परीक्षेचे “आयएएस’ हे भारतीयीकरणही करण्यात त्यांची मोलाची भूमिका होती. पटेल यांच्या मृत्यूनंतर “मॅचेस्टर गार्डियन’ या परदेशी दैनिकाने त्याच्याबद्दल लिहिले होते “ते कुशल संघटक आणि शिस्तप्रिय नेते होते. पटेलांशिवाय गांधीजींच्या कल्पनांचा व्यावहारिक परिणाम दिसला नसता आणि नेहरूंच्या आदर्शांनाही फारसा वाव मिळाला नसता. ते केवळ स्वातंत्र्यलढ्याचे संघटक नव्हते, तर स्वातंत्र्योत्तर नव्या भारताचे शिल्पकार होते. एकाच व्यक्तीने बंडखोर क्रांतिकारक आणि राजकीय मुत्सद्दी अशा दोन्ही पातळींवर यश मिळवणे तसे दुर्मिळ असते. पटेल याला अपवाद होते.’ पटेल यांच्याविषयीची ही नोंदच बरेच काही सांगून जाणारी आहे. बार्डोलीच्या सत्याग्रहाने त्यांना सरदार ही पदवी दिली. त्यांनी संस्थाने विलीन करून एकात्म भारताचे आपण शिल्पकार असल्याचे सिद्ध केले. पटेल यांच्या चरित्राचे सर्व महत्त्वाचे पैलू या चरित्रात ठळकपणे समोर येतात. भगवान दातार यांनी अनुवाद करताना कुठेही हा अनुवाद वाटणार नाही, इतक्‍या ओघवत्या भाषेत आणि चांगल्या मराठीत व ओघवत्या भाषेत केला आहे. देशातील सत्तांतरावेळची परिस्थिती आणि त्या वेळचे वातावरण आणि पटेल यांची कामगिरी समजून घ्यायची असेल, तर हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे.Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s