Laxmiche Chakra:Saptahik Sakal

Article about agro-tourism pioneer in Maharashtra Mr.Pandurang Taware published in Saptahik Sakal (20th April,2013)-

Click here to read it on Saptahik Sakal’s website


कृषी पर्यटनातील “लक्ष्मीचे चक्र’5245024345959274533_Orgपांडुरंग तावरे यांनी मोरगावजवळच्या पळशी या खेड्यातील उजाड माळरानातील 30 एकर जमीन कर्ज काढून विकत घेतली. जमिनीच्या नैसर्गिक उताराचा फायदा घेऊन मोठे शेततळे बांधले, झाडी लावली. शेतकऱ्यांच्या संस्कृतीची ओळख करून देणारी छोटी छोटी निवासस्थाने बांधली. अंगण, रांगोळी, गोठा, गायी-म्हशी, धारा काढणे, तळे, पाणी, उभी पिके, खुरपणी, बैलगाडी, चूल, पाटावर बसून जेवण अशा गोष्टी उपलब्ध करून दिल्या… तावरे यांचा उपक्रम पाहता पाहता “क्‍लिक’ झाला. पर्यटनातून पैसा, पैशातून रोजगार, रोजगारातून सुविधा, सुविधांतून सेवा आणि या सर्वांतून पुन्हा नवे पर्यटक असे “लक्ष्मीचे चक्र’ सुरू झाले.. त्याची कहाणी…शेतकरी कुटुंबांनी आपल्या कुटुंबाचा शेतीवरचा भार कमी केला पाहिजे, असा सल्ला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काही वर्षांपूर्वी दिला होता. त्यानंतर त्यांनी अनेक वेळा त्याचा पुनरुच्चारही केला. स्वतः शेतकरी असणे, धोरण राबविणे आणि धोरण ठरविणे या तिन्ही भूमिकेतून आलेला पवारांचा शेतीविषयीचा अनुभव वादातीत आहे. अशा माणसाला 50 वर्षांनंतरचे चित्र स्पष्ट दिसत असते. शेतीवरचा भार कमी करण्याचे पवारांचे सांगणे त्याच तळमळीतून आले होते.
पवारांच्या त्या आवाहनाचे देशात आणि राज्यात अनेकांनी अनेक अर्थ घेतले. आपापल्या समजुतीप्रमाणे नि हितसंबंधांप्रमाणेही! पण बारामतीजवळच्या एका गावातील सर्वसामान्य कुटुंबातील एका तरुणाला त्या आवाहनातील नेमका अर्थ उमगला. शेती न सोडता किंवा शेती “डिस्टर्ब’ न करता शेतीवरील भार कमी करण्याची एक कल्पना त्याच्या मनात तरळून गेली. या कल्पनेवर त्याने दहा वर्षांहून अधिक काळ कमालीचे कष्ट घेतले. स्वतः हाडाचा शेतकरी असल्यामुळे रुजवलेले बी उगवून त्याचे रोप होईपर्यंत आणि त्या रोपाला फळे-फुले येईपर्यंत अमर्याद कष्ट करण्याची सवय त्याला स्वभावतःच होती. त्याच्या या संकल्पनेचेही तसेच झाले.
दिल्लीच्या विज्ञानभवनात काही दिवसांपूर्वी म्हणजे 18 मार्च रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते या तरुणाचा खास पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार स्वीकारताना केवळ त्याचेच नव्हे तर त्याच्या या अभिनव उपक्रमात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या 170 शेतकऱ्यांच्या कुटुंबातील साऱ्यांचे मन भारावून गेले होते. “सगळे कुटुंबीय’ असे म्हणण्याचे कारण म्हणजे, आपल्या या अभिनव योजनेत त्याने शेतकरी परिवारातील माणसांसह अगदी गाई-बैल आणि शेळ्या-मेंढ्या यांनाही अगदी सहजपणे गुंफून घेतले आहे.
या तरुणाचे नाव पांडुरंग तावरे होय. सगळे गाव हे एक कुटुंब मानण्याचा स्वभाव. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा आपल्या एकट्यालाच नव्हे, तर अन्य पाच-पन्नास जणांना फायदा झाला पाहिजे, हा विचारांचा पाया. यातूनच कल्पना सुचली, ती “कृषी पर्यटना’ची. शेतकऱ्याचे त्याच्या प्राणप्रिय शेतीशी, त्याच्या “काळ्या आई’शी असलेले नाते कायम राखत त्याला जादा उत्पन्न मिळवून देणारी साधी, सरळ योजना. राबवायलाही अगदी सोपी; अगदी “मंत्र छोटा, तंत्र सोपे- परि यशस्वी ठरले जे’ या गीतातील आशयासारखी.. कुणालाही जमेल अशी!
उदाहरणच द्यायचे झाले, तर शिरूरजवळच्या रांजणगाव शिवारातील भांबुर्डे येथील रमेश संकपाळ या शेतकऱ्याचे देता येईल. त्याची शेती होती अवघ्या दीड एकराची. पाण्याचेही तसे दुर्भिक्षच. खडतर जीवन पाचवीला पुजलेले. कधी आकाशाकडे, तर कधी त्या दीड एकराच्या तुकड्याकडे बघत आला दिवस कसाबसा ढकलणे हाच त्याचा नित्यक्रम. त्याला तावरे यांच्या प्रयोगाची कुणकूण लागली. तो तावरे यांना भेटला. कृषी पर्यटनाची गुरुकिल्ली त्याला मिळाली. आपल्या जमिनीत पाय रोवून तो उभा राहिला. तावरे यांच्या सल्ल्याने “कडक’ मेहनत घेतली. मूळ शेतीला धक्का न लावता आवश्‍यक ते फेरबदल केले. फारशा खर्चिक नसलेल्या योजना राबविल्या. सगळे कुटुंबच हातात हात घालून उभे राहिले. शेती तर फुललीच, पण कृषी पर्यटनामुळे जोड-आवक सुरू झाली. काही वर्षांपूर्वी उजाड असलेले हे टुमदार शेत आता अनेकांचे आकर्षण ठरले आहे. अगदी शिरूरच्या “एमआयडीसी’मधील कारखान्यांमध्ये येणाऱ्या बड्या पाहुण्यांनाही तेथील मॅनेजरसाहेब रमेशरावांच्या शेतात पाहुणचारासाठी आणायला लागले. रमेशचे जणू भाग्यच बदलले.
4853655761831483075_Orgजुन्नरजवळच्या राजुरी गावातील मनोज हाडोळे या तरुणाने तर भाड्याने शेती घेऊन हा प्रयोग राबवला. या प्रयोगातून होणारा फायदा लक्षात घेऊन त्याने बॅंकेतील नोकरी सोडून पूर्णपणे कृषी पर्यटनावरच लक्ष केंद्रित केले. असे कितीतरी जण.. आज जवळपास 170 शेतकऱ्यांनी तावरे यांच्या उपक्रमाला आपल्या शेतात दृश्‍यरूप दिले आहे.
शेती हा आजही बहुसंख्य लोकांच्या आकर्षणाचा विषय आहे. झपाट्याने शहरीकरण होत असल्यामुळे अनेक जण या शेतीच्या सहवासासाठी आसुसलेले असतात. आपण ज्यांच्या कष्टावर जगतो त्या शेतकऱ्यांविषयी व त्यांच्या शेतीविषयी सगळ्यांच्याच मनात कृतज्ञतेचा भाव असतो आणि त्यांना तो व्यक्त करायचा असतो. कित्येकांना या कष्टाचे आकर्षण असते; तर तेथील शांत, स्वच्छ, निर्मळ वातावरण हे अनेकांचे स्वप्न असते. या सगळ्यांना आपल्या शेतात यावेसे वाटेल, अशा स्वरूपाचे आवश्‍यक ते बदल आपल्या शेतात करणे म्हणजेच कृषी पर्यटन. मॅनेजमेंटच्या भाषेत सांगायचे, तर यात “हॉस्पिटॅलिटी’पासून “ऍम्बियन्स’पर्यंतच्या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. अल्पशा खर्चात आणि आपल्या शेतीला व परंपरागत सभ्य संस्कृतीला जराही धक्का न लावता हे करता येते.
इतरांना उपदेशामृत पाजण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रयोगानेच ते सिद्ध करण्याचे तावरे यांनी ठरवले. शेतीपासून संगीतापर्यंत अनेक विषयांत रस असणारे तावरे तसे हरहुन्नरी. झब्बा-पायजमा-टोपी अशा वेशात सहजपणे वावरणारे पांडुरंगराव सुटाबुटातही अगदी फिट्ट बसणारे आहेत. मोरगावजवळच्या पळशी या खेड्यातील उजाड माळरानातील 30 एकर जमीन त्यांनी कर्ज काढून विकत घेतली. जिथे एखादे झाडही सापडणे मुश्‍कील होते, तिथे काही हजार झाडे लावून ती जोपासली. जमिनीच्या नैसर्गिक उताराचा फायदा घेऊन मोठे शेततळे बांधले. सध्याच्या तीव्र उन्हाळ्यात, सगळीकडे पाण्याची टंचाई असताना या तळ्यात आजही भरपूर पाणी आहे. शेतकऱ्यांच्या संस्कृतीची ओळख करून देणारी छोटी छोटी निवासस्थाने त्यांनी बांधली. अंगण, रांगोळी, गोठा, गायी-म्हशी, धारा काढणे, तळे, पाणी, उभी पिके, खुरपणी, बैलगाडी, चूल, पाटावर बसून जेवण अशा शहरी जीवनात अप्राप्य बनलेल्या गोष्टी त्यांनी उपलब्ध करून दिल्या. हिरव्यागार झाडांमुळे सावली आणि शुद्ध हवा होतीच.. आणि या सगळ्याबरोबर होते कमालीचे अगत्य… अकृत्रिम आणि स्नेहशील!
पर्यटकाला तरी वेगळे काय हवे असते? हायफाय रिसॉर्ट5113959160551217140_Orgच्या लुटारू दांभिकतेला वैतागलेल्या पर्यटकांना हा माहोल वेगळाच आनंद देणारा होता. तावरे यांचा उपक्रम पाहता पाहता “क्‍लिक’ झाला. त्यांच्या या पर्यटन केंद्राला भेट देणाऱ्यांची संख्या 10 हजारांच्या पुढे गेली. जगातील 14 देशांतील पर्यटक त्यांच्याकडचा पाहुणचार घेऊन गेले आहेत. पर्यटनातून पैसा, पैशातून रोजगार, रोजगारातून सुविधा, सुविधांतून सेवा आणि या सर्वांतून पुन्हा नवे पर्यटक असे “लक्ष्मीचे चक्र’ सुरू झाले.
“समृद्धी समाधानातून आली, तरच ती सुखाची ठरते,’ हे तावरे यांच्या विचारांचे सूत्र आहे. मग आपल्या या वाटचालीत त्यांनी स्थानिकांना सामावून घेतले. मोठ्या पर्यटनस्थळावरील बड्या बड्या हॉटेलांमध्ये स्थानिकांना कितपत वाव मिळतो, हा प्रश्‍न त्यांच्या मनात सतत डाचत होता. त्यांच्या या पर्यटन प्रकल्पात त्यांनी कल्पकतेने अनेक उपक्रम राबवले. मेंदी हा प्रकार आला नि मेंदी काढणाऱ्याचा रोजगार सुरू झाला. बैलगाडीची फेरी आकर्षण ठरली आणि गाडीवाल्यांसाठी रोजगाराचे दालन तर उघडलेच; पण खिलाऱ्या बैलांच्या चारापाण्याचीही सोय झाली. गोठे गुरांनी फुलले आणि अंगणे सडा-रांगोळ्यांनी सजली. गावात कणसे, पेरू विकणारीला जादा कमाई सुरू झाली. गावातील प्रमुख ठिकाणांची माहिती सांगणारे नवे “राजू गाईड’ तयार झाले. चहावाल्याकडच्या कपबशांची संख्या वाढली आणि कलाकुसरीची कामे करणाऱ्यांना गावातच कामे मिळायला लागली. केवळ पळशी गावातच नव्हे, तर तावरे यांची योजना राबविणाऱ्या 170 शेतकऱ्यांच्या गावांतही छोट्या-मोठ्या प्रमाणावर हेच “लक्ष्मीचे चक्र’ सुरू झाले.
“”महाबळेश्‍वरसारख्या ठिकाणी एखादे हॉटेल काढले असते तर मी एकटा श्रीमंत झालो असतो. “बीएमडब्ल्यू’सारख्या गाडीतून फिरलो असतो. पण मला माझ्याबरोबरच माझ्या गावातल्यांचाही विकास करायचा होता,” हे तावरे यांचे मनोगत त्यांच्या मनातील तळमळ व्यक्त करणारे होते.
तावरे यांनी पळशी येथे कृषी पर्यटनाचे केंद्र सुरू केले आहे. मागणी येईल तिथे, ते आणि त्यांचे सहकारी सल्ला देण्यासाठी तिथून जातात. पाच दिवसांचा एक अभ्यासक्रम त्यांनी तयार केला आहे. जुजबी सुधारणा ते सुचवतात. आंबा महोत्सव, पतंग महोत्सव, जत्रा फेस्टिव्हल, ग्रामीण संस्कृतीची ओळख अशा नवनवीन कल्पना ते सुचवतात. पाहता पाहता तिथेही कृषी पर्यटन सुरू होते; घरातील एकही माणूस रोजगारासाठी बाहेर न जाता! शरद पवार यांच्या लक्षात आलेला “शेतीवरचा भार’ सहजपणे कमी होतो.
पांडुरंग तावरे यांना राष्ट्रपतींकडून मिळालेल्या पुरस्काराचे नाव आहे, “बेस्ट रिस्पॉन्सिबल टुरिझम प्रोजेक्‍ट ऑफ इंडिया’. तावरे यांनी सामाजिक जबाबदारीचे जे भान ठेवले आहे, त्याचाच हा गौरव आहे. यापूर्वी त्यांना 2008 चा राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार मिळाला होता. त्याचप्रमाणे 2011 मध्ये त्यांना “ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम’ पुरस्कार लंडनमध्ये ओमान व स्वित्झर्लंडच्या पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते मिळाला होता.
तावरे यांच्या संघटनेचा 16 मे 2004 हा स्थापना दिवस. तो दिवस ते “जागतिक कृषी पर्यटन दिन’ म्हणून साजरा करतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या UNWTO (United Nations World Tourism Organizations) या संघटनेने हाच दिवस जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून स्वीकारला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या कॅलेंडरवरही तो आला आहे. एका अर्थाने तावरे यांनी भारताला जागतिक बहुमानच मिळवून दिला आहे.5301075148638016591_Org


Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s