Dhyaasmagna

Article on Shri Narendra Dabholkar published in Saptahik Vivek


narendra dabholkar

“शक्य तेवढया कठोर शब्दांत आणि त्यांच्या कार्याचा पाठपुरावा करण्याच्या कृतीतून डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा निषेध व्हायला हवा. ही हत्या निर्घृण तर आहेच, पण साऱ्या महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे. समाजासाठी तळमळीने झटणारं एक जीवन हल्लेखोरांनी संपवलं असलं तरी त्यांचा विचार मारणं अशक्य आहे.बॅरिस्टर नाथ पै, उपनिषदातल्या एका श्लोकाचं उदाहरण नेहमी देत असत.

न त्वहं कामये राज्यं, न स्वर्गं ना पुनर्भवम
कामये दु:ख तप्तानां, प्राणीनाम आर्तिनाशनम् ॥

असा तो श्लोक होता. ‘आम्हाला सत्ता नको, संपत्ती नको, स्वर्गाचं राज्यही नको. पण जे दु:खानं वाकलेले आहेत, जे भयभीत आहेत, जे पीडित आहेत, त्यांचे अश्रू पुसण्याची शक्ती, हे परमेश्वरा आम्हाला दे’ असा या श्लोकाचा सरळ अर्थ.


डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचं जीवन पाहिलं तर ते या श्लोकाचा अन्वयार्थ नेमकेपणाने जगले, असंच म्हणावं लागेल. आयुष्यभर ज्यांनी वेद, उपनिषदं, पुराणं आणि धर्म यांना विरोध केला, त्यांच्या जीवनाचं यथार्थ वर्णन करण्यासाठी उपनिषदातलाच एक श्लोक चपखल ठरावा याला योगायोगच म्हणावं लागेल.


‘शब्दांचे अर्थ पुस्तकात शोधू नका’ असं आचार्य विनोबा म्हणायचे. ‘पुस्तकातली नदी बुडवत नाही, पुस्तकातली होडी वाचवत नाही’ असं विनोबा गंमतीनं म्हणायचे. वरील श्लोकातला शाब्दिक अर्थ डॉक्टर दाभोलकरांनी जीवनात शोधण्याचा प्रयत्न केला. एका अर्थाने या शब्दांचा मागोवा घेतच त्यांचं प्रत्येक पाऊल पडलं. आपण ज्या समाजाचे घटक आहोत त्या समाजातल्या असंख्य दीनदुबळया, पीडित, पिचलेल्या लोकांची आर्त हाक त्यांना पावलापावलावर ऐकू येत असावी. एखाद्या निष्णात डॉक्टरला रुग्णाच्या कण्हण्यातूनही त्याची वेदना कळावी, तसं दाभोलकरांचं होत. या समाजरूपी रुग्णाला नेमकं काय झालंय, याची त्यांना पुरती कल्पना होती. या रुग्णाला बरं करणं हेच त्यांनी आपलं इतिकर्तव्य मानलं. हे करताना ते कधी थांबले नाहीत, कधी थकले नाहीत. झुकायचा तर प्रश्नच नव्हता.


पट्टीचे कबड्डी खेळाडू असलेल्या दाभोलकरांनी कबड्डीतून दोन गोष्टी नेमकेपणाने उचलल्या. कबड्डीतली त्यांची हनुमान उडी अनेकांना अचंबित करणारी होती. पण आपल्या या आवडीच्या खेळाचा जीवनात उपयोग करून घेताना या गोष्टी सहजपणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भिनल्या. एक म्हणजे त्यांच्या मनाचा निर्धार कमालीचा बळकट झाला. आपल्याला अडवायला विरोधकांनी सर्व शक्तीनिशी तगडी साखळी उभी केली असताना ती साखळी निष्प्रभ करून आपला मुद्दा कसा पुढे न्यायचा, याची कला त्यांना साधली होती. त्यांच्या मनातली हनुमान उडीची ऊर्मी कोणत्याही अडथळयावर सहजपणे मात करण्याची प्रेरणा द्यायची. आणि खेळाचा दुसरा फायदा म्हणजे त्यांची जीवनाकडे बघण्याची निर्वैर वृत्ती. एकदा ध्येय ठरल्यानंतर त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं एवढंच उरतं. मग त्यात ना कुठली ईर्षा राहते, ना कुठलं वैर. या वृत्तीमुळेच दाभोलकर या व्यक्तीला कशाचाही लोभ किंवा असूया राहिली नव्हती. त्यामुळेच पैसे कमवून गडगंज बनण्याचा विचार त्यांच्या मनात कधीही आला नाही. मानमरातबांच्या विचारांचा तर त्यांना स्पर्शही झाला नाही. नेहमी हसतमुख असलेले दाभोलकर शेवटपर्यंत साधे-सरळ राहिले. जितके विनम्र, तितकेच साधे.


अनेक चळवळीतून पुढे जाणाऱ्या दाभोलकरांनी शेवटी अंधश्रध्देविरुध्दचा लढा हे एकमेव उद्दिष्ट मानलं. मुळात जाऊन पाहिलं तर या रूढी, परंपरा आणि अंधश्रध्दा यांनी विशुध्द हिंदू धर्माला जेवढं नुकसान पोहोचवलंय, तेवढं अन्य कशानेही नसेल. या अंधश्रध्दांनी तर मानवतेचाही बळी घेतला होता. अंधश्रध्देच्या आहारी जाऊन केले जाणारे अत्याचार तर कुणाच्याही अंगावर काटा उभा करणारे आहेत. कोणी या अत्याचारांचा विरोध करत असेल आणि त्या अत्याचारांच्या मुळाशी असलेल्या अंधश्रध्देवर आघात करत असेल, तर त्याचं स्वागतच करायला हवं. समाजाच्या सर्व थरातून असा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला असता तर दाभोलकरांचं काम सोपं झालंच असतं, पण समाजाचाही केवढातरी फायदा झाला असता. शतकानुशतकांच्या या अंधश्रध्देच्या शृंखलांतून समाजाची मुक्तता झाली असती. तुकाराम महाराजांसारख्या संतश्रेष्ठानेही समाजातल्या अंधश्रध्देवर प्रहारच केले होते ना?


सुरुवातीला साताऱ्यात आणि साताऱ्यातून पुण्यात आलेल्या दाभोलकारांची व्हिजन केवळ भारतापुरतीच नव्हे, तर विश्वाला साद घालणारी होती. अन्यायाच्या विरोधात लढताना ज्ञानेश्वरांची विश्वात्मक दृष्टीच त्यांना अभिप्रेत होती. म्हणून अन्याय कुठलाही असो, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातला असो किंवा कोणत्याही धर्म-परंपरेतला असो, त्यांनी सारख्याच तीव्रतेने त्यावर आघात केले.


पण कधीकधी वाटतं की डॉक्टरांनी हिंदूंना थोडं चुचकारत आपले प्रयोग केले असते, तर ते अधिक व्यापक स्तरावर यशस्वी झाले असते. आईने कायम पाठीत धपाटे घातले तरच मूल सुधारतं, ही कल्पना तितकीशी खरी नाही. डॉक्टर ज्यांना मानतात, ते महात्मा गांधी, विनोबा भावे, शाहू महाराज, बाबा आमटे हेही सच्चे समाजसुधारक होते. पण ‘हिंदूविरोधी’ अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली नाही. भारतातील लोकमानसाचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी खरोखरच खोलात जाऊन याचा अभ्यास करायला हवा. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांचं एक उदाहरण बोलकं आहे. नागपूरचे कार्यकर्ते व नंतर आमदार झालेले बच्छराज व्यास प्रथम संघशिबिरात आले, ते स्वत:चा लवाजमा घेऊन. ‘मला तुमचं अन्न चालणार नाही’ असं म्हणत. त्यांनी स्वत:चा स्वयंपाकीही आणला होता. पण शिबिरातलं वातावरण पाहून त्यांची त्यांनाच लाज वाटली आणि स्वयंपाक्याला परत पाठवून ते शिबिरात रममाण झाले. दृष्टी स्वच्छ करण्यासाठी डोक्यात झणझणीत अंजन तर घालायलाच हवं; पण ते हळुवार हातांनी घातलं, तर ते अधिक सहजपणे स्वीकारलं जाणार नाही का? एका संपादकांनी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर हे खरोखरच ‘देव न मानणारा देवमाणूस’ होते. खूप वर्षापूर्वी श्री.म. माटयांनी याच शब्दात आगरकरांचं वर्णन केलं होतं. आता देव न मानणाऱ्याचं वर्णनही ‘देव’माणूस या शब्दात होत असेल, तर ‘देव’ ही संकल्पना व्यापक जनमानसाच्या मनात किती रुजली आहे याचंच ते निदर्शक आहे. मग देवाला रिटायर करण्याऐवजी या संकल्पनेचा सुधारणेसाठी वापर करता येईल का? कोटयवधींचा समाज देव मानणारा असेल, तर मग हा देवच सामाजिक न्यायाला अनुकूल असा बनवता येणार नाही का? शेवटी ‘देव दानवा नरे निर्मिले’ हा केशवसुतांचा विचार प्रमाण मानला, तर अस्पृश्यता न पाळणारा, समतेचं तत्त्वज्ञान सांगणारा, स्त्रियांवरील अत्याचाराला विरोध करणारा, शिक्षणाचं महत्त्व जाणणारा, अंधश्रध्देला मूठमाती देणारा, बुवाबाजीला थारा न देणारा असा एखादा आधुनिक देव निर्माण करणं शक्य नाही का? डॉक्टरांसारख्याला ते सहज शक्य झालं असतं.


आपल्या प्रतिपाद्य विषयासाठी धारदार युक्तिवाद हा त्यांचा स्वभावविशेष होता. तेजतर्रार बुध्दिमत्तेमुळे त्यांचं प्रतिपादन अधिकच आक्रमक होत असे. शिवाय एखाद्या विषयावर केवळ अनेक दिवसच नाही, तर वर्षानुवर्षं वाद घालायची चिकाटी त्यांच्याकडे होती. पण हा वाद घालताना त्यांची भाषा कधी अश्लाघ्य बनली नाही, की त्यांच्या शब्दांनी कुणाला रक्तबंबाळ केलं नाही. समजूतदारपणाची, समजावून सांगण्याचीच त्यांची भाषा होती. त्यामुळेच अंधश्रध्दाविरोधी विधेयकाच्या भाषेत सुधारणा करण्याचा त्यांनी परोपरीने प्रयत्न केला.


दाभोलकरांना अत्यंत आवडणाऱ्या कबड्डीच्या खेळातलाच एक दृष्टान्त इथे योग्य ठरू शकेल. कबड्डीत एखादा खेळाडू प्रतिसर््पध्याच्या पकडीत सापडून बाद होतो. पण तो काही कायमचा खेळाबाहेर जात नाही. दुसऱ्या कुठल्यातरी खेळाडूने प्रतिसर््पध्याचा एखादा गडी बाद केला तर हा खेळाडू पुन्हा जिवंत होतो. कारण ते बाद होणं क्षणिक असतं. दुसऱ्या खेळाडूकडून नवजीवन मिळालं की ते मरण संपतं आणि एक अधिक सतेज, टवटवीत आणि अधिक ईर्षायुक्त नवजीवन तिथून सुरू होतं.


ज्या अंधश्रध्देला दाभोलकरांनी जन्मभर शत्रू मानलं, त्या अंधश्रध्दांपैकी एकीचा जरी नायनाट केला तर सध्या तात्पुरते बाद झालेल्या दाभोलकरांना नवजीवन मिळेल आणि असंख्य नवे विचार घेऊन दाभोलकर पुन्हा आपल्यात येतील. त्यासाठी एकातरी अंधश्रध्देचा नायनाट करण्याचा निर्धार तुम्ही-आम्ही करायला हवा. ध्यासमग्न दाभोलकर पुन्हा यावेत,ते यासाठी.


Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s