‘दादी’ याद दिला दो!

My article about JNU Crisis in Saptahik Vivek. 


‘दादी’ याद दिला दो!


378_03_45_50_jnu-1_647_021416080950_H@@IGHT_250_W@@IDTH_400


जेएनयू विद्यापीठातील फुटीरतावादी विद्यार्थी आणि त्यांना बहकवणारे उपटसुंभ नेते यांनी घातलेला धुडगूस आणि त्यांची ‘राष्ट्रविरोधी’ घोषणाबाजी आज सगळयांच्याच काळजीचा विषय बनली आहे. ‘अफजल हम शरमिंदे है, तेरे कातिल जिंदा है।’ अशी घोषणा विद्यार्थी देत होते. अफजलला ज्यांनी फासावर लटकवलं, ते म्हणजे सर्वोच्च न्यायालय, त्या वेळचे पंतप्रधान आणि त्याचा दयेचा अर्ज फेटाळणारे राष्ट्रपती हे त्यांच्या दृष्टीने ‘कातिल’ ठरतात. मग याच न्यायाने राहुल यांच्या आजी दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी याही मकबूलच्या कातिल ठरतील. राहुल यांना हे मान्य आहे? म्हणूनच उन्हे ‘नानी…नव्हे, दादी याद दिला दो’ असं म्हणायचं.


 

 काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी लोकप्रियतेच्या ऐन शिखरावर असतानाची ही गोष्ट. साधारणत: जून 1985मधली. एअर इंडियाचं कनिष्क विमान उडवून देऊन अतिरेक्यांनी भारताला मोठाच धक्का दिला होता. ती तारीख होती 23 जून 1985. राजीव तसे शांत स्वभावाचे म्हणून ओळखले जात. पण हा धक्का खूपच तीव्र होता. संतापलेल्या आवाजात राजीव गांधींनी पाकिस्तानला सणसणीत इशारा दिला, ‘हम उन्हे उनकी नानी याद दिला देंगे!’ राजीव गांधींच्या या भाषणाची नंतर अनेक वर्षे चर्चा होत राहिली. इतकी की हे वाक्य त्यांना कायमचं जोडलं गेलं. (त्या वेळचे विख्यात संवादलेखक सलीम-जावेद यांच्याकडून राजीव गांधी भाषणाच्या टिप्स घेतात, असंही तेव्हा बोललं जात असे.)

हे वाक्य आज जरा वेगळया संदर्भात आठवलं ते राहुल गांधी यांच्या अपरिपक्व वर्तनामुळे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू (JNU) विद्यापीठातील देशद्रोही घोषणा करणाऱ्यांच्या सभेत स्वातंत्र्याचा लढा लढणाऱ्या काँग्रेसचे हे उपाध्यक्ष थेट जाऊन बसले. नकळत (किंवा समजून उमजून) फुटीरतावाद्यांचं समर्थन करणाऱ्या या बालबुध्दीच्या नातवाला त्याच्या दादीची (आजीची – वडिलांच्या आईची) याद करून देण्याची वेळ आली आहे, असं वाटतं.

हा बादरायण संबंध आहे असं तुम्हाला सकृतदर्शनी वाटेल, पण तो तसा नाही. जेएनयू विद्यापीठातील फुटीरतावादी विद्यार्थी आणि त्यांना बहकवणारे उपटसुंभ नेते यांनी घातलेला धुडगूस आणि त्यांची ‘राष्ट्रविरोधी’ घोषणाबाजी आज सगळयांच्याच काळजीचा विषय बनली आहे. चीड आणणाऱ्या या प्रकरणाला मोदीविरोधी आणि भाजपाविरोधी राजकीय नेते खतपाणी घालत आहेत. राहुल गांधी यांनी राष्ट्रविरोधी घोषणा देणाऱ्यांच्या सभेत हजेरी लावून एक प्रकारे या घोषणांचं समर्थन केलं. या विद्यार्थ्यांच्या दोन दिवस आधी झालेल्या सभेत व्यासपीठावर जो मोठा फलक लावलेला होता, त्यावर संसदेवरील हल्ल्याच्या कृत्याबद्दल फासावर लटकवल्या गेलेल्या अफजल गुरूच्या बरोबरीने मकबूल बट याचाही फोटो होता. ते माथेफिरू विद्यार्थी त्याला ‘शहीद’ म्हणून डोक्यावर घेत होते. काश्मीरच्या आझादीचे नारे लावत होते. एक प्रकारे हे आपणास मान्य आहे, असाच ‘सिग्नल’ राहुल यांच्या उपस्थितीतून जात होता. त्याचमुळे त्यांना त्यांच्या दादीची याद करून द्यायला पाहिजे, असं वाटतं.

कोण होता हा मकबूल बट, हे थोडं इतिहासात डोकावून पाहिलं तर राहुल यांचे डोळे नक्की उघडतील. ‘अफजल हम शरमिंदे है, तेरे कातिल जिंदा है।’ अशी घोषणा विद्यार्थी देत होते. अफजलला ज्यांनी फासावर लटकवलं, ते म्हणजे सर्वोच्च न्यायालय, त्या वेळचे पंतप्रधान आणि त्याचा दयेचा अर्ज फेटाळणारे राष्ट्रपती हे त्यांच्या दृष्टीने ‘कातिल’ ठरतात. मग याच न्यायाने राहुल यांच्या आजी दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी याही मकबूलच्या कातिल ठरतील. राहुल यांना हे मान्य आहे? म्हणूनच ‘उन्हे नानी नाही तर दादी याद दिला दो’ असं म्हणायचं.

आता हा मकबूल बट कोण होता हेही सांगायला हवं. कुपवाडा जिल्ह्यातील त्राहग्राम इथे जन्मलेला मकबूल आधी जम्मू-काश्मीरमध्ये शिकला आणि त्याने पाकिस्तानात पेशावरला पदव्युत्तर शिक्षण घेतलं. याच्या चार भावांपैकी दोघे जण सुरक्षा दलाबरोबरच्या चकमकीत मारले गेले आणि तिसरा अचानक बेपत्ता झाला. त्याचा नंतर काहीच पत्ता लागला नाही. हा त्याच्या कुटुंबाचा इतिहास. 18 फेब्रुवारी 1938मध्ये जन्मलेला मकबूल काश्मीरच्या आझादीच्या भावनेने पछाडला गेला. त्याच उद्दिष्टासाठी त्याने जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) ही दहशतवादी संघटना स्थापन केली. या संघटनेच्या कारवायांसाठी 1964मध्ये तो भारतात घुसला. आणखी एक दहशतवादी औरंगजेब याच्या साथीने पोलिसांवर त्याने केलेल्या हल्ल्यात सी.आय.डी.चे अधिकारी अमीरचंद ठार झाले. औरंगजेबही या चकमकीत मरण पावला, पण मकबूल मात्र पकडला गेला. त्याच्यावर रीतसर खटला चालला आणि त्याला न्या. ए.के. गंजू यांनी फाशीची सजा सुनावली. (फाशीची शिक्षा सुनावणारे न्यायाधीश नीलकंठ गंजू यांची 4 नोव्हेंबर 1989ला भर न्यायालयात हत्या झाली.)

न्यायाधीशांनी त्याला ‘भारताच्या शत्रूचा हस्तक’ असं म्हटलं तेव्हा भर न्यायालयात अत्यंत उध्दटपणे तो म्हणाला, ”मी हस्तक नाही, मी भारताचा शत्रूच आहे.”

मकबूलला श्रीनगरच्या तुरुंगात ठेवलं होतं, पण तुरुंगातून भुयार खणून तो 1968मध्ये पाकिस्तानात पळाला. आता त्याने पाकिस्तानातून भारताविरोधी कारवाया सुरू केल्या. 1971मध्ये पाकिस्तानने भारताचं एक विमान पळवलं होतं. त्या कटाचा सूत्रधार मकबूलच होता.

मकबूल 1974ला पुन्हा भारतात घुसला. 1975मध्ये त्याने बांगेट इथं एका बँक मॅनेजरची हत्या केली आणि बँक लुटली. दरम्यान या प्रकरणात मकबूल पुन्हा पकडला गेला. रीतसर खटला चालून न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. सुरक्षिततेच्या कारणावरून त्याला दिल्लीच्या तिहार तुरुंगात हलविण्यात आलं. त्या वेळी राष्ट्रपती होते ग्यानी झैलसिंग आणि पंतप्रधान होत्या श्रीमती इंदिरा गांधी. फाशीच्या शिक्षेनंतर भारतीय कायद्यांचा आधार घेत त्याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला.

दरम्यान मकबूलचा साथीदार अमानुल्ला खान इंग्लंडमध्ये कारवाया करत होता. मकबूलला सोडवण्यासाठी त्याने लंडनमधील भारतीय वकिलातीतले साहाय्यक आयुक्त रवींद्र म्हात्रे यांना पळवून नेलं. म्हात्रे यांच्या सुटकेच्या बदल्यात अमानुल्ला खानने मकबूलच्या सुटकेची आणि एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. 3 फेब्रुवारी 1984ला म्हात्रे यांना लंडनमधील बकिंगहॅम भागातून पळवून नेण्यात आलं. त्याच दिवशी रात्री अत्यंत घाणेरडया व व्याकरणाच्या चुका असलेल्या भाषेत लिहिलेली एक चिठ्ठी एका वृत्तसंस्थेच्या कार्यालयात पोहोचवून आपण त्यांचं अपहरण केल्याचं अतिरेक्यांनी जाहीर केलं. मागण्या मान्य न झाल्यास म्हात्रे यांना ठार मारलं जाईल, अशी धमकी त्यांनी दिली होती.

श्रीमती गांधींनी तातडीने वरिष्ठ मंत्र्यांची बैठक बोलावली. या मागण्यांपुढे न झुकण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उच्चस्तरीय मंत्र्यांची व अधिकाऱ्यांची बैठक दर ठरावीक तासांनी व्हायला लागली. 6 फेब्रुवारी 1984ला अतिरेक्यांनी म्हात्रे यांची हत्या केली. त्यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली होती. त्यांचा मृतदेह त्याच भागात रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आला होता. एका ब्रिटश महिलेला तो दिसला व तिने पोलिसांना कळवलं.

म्हात्रे यांची हत्या हे एक प्रकारे भारत सरकारलाच आव्हान होतं. कोणत्याही देशाने ते सहन केलं नसतं. या घटनेनंतर दिल्लीत तातडीने चक्र फिरली आणि मकबूल बटला 11 फेब्रुवारी 1984 रोजी तिहार तुरुंगात फासावर लटकवण्यात आलं. तत्पूर्वी त्याचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला. त्याला फाशी दिल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना फाशीनंतर समजली. त्याचा मृतदेहही कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला नाही. तिहार तुरुंगातच त्याचं दफन करण्यात आलं. इंदिरा गांधींनी कणखरपणे अतिरेक्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं.

शहीद म्हणून जेएनयूमध्ये फुटीरतावादी घटक याच मकबूलचा गौरव करत होते आणि त्यांच्यावर कारवाई केली म्हणून राहुल गांधी सरकारचा निषेध करत होते. त्यांची आजी इंदिरा गांधी यांचाच हा एक प्रकारे निषेध नव्हता का? शीर्षकात ‘दादी याद दिला दो’ म्हटलंय ते याचमुळे.

आणखी एका गोष्टीसाठी त्यांना या आजीची आठवण करून द्यायला हवी. घटनेने स्वातंत्र्य दिलं असताना एखाद्याचा आवाज दडपणं म्हणजे राष्ट्रद्रोह असं राहुल त्या दिवशी तावातावाने बोलत होते; पण याच त्यांच्या आजीने देशात अणिबाणी लागू करून कोटयवधी जनतेचा आवाज दडपला होता, साऱ्या देशाचाच त्यांनी तुरुंग बनवला होता.. या कृत्याबद्दल इंदिरा गांधींना काय म्हणायचं ते आता राहुल यांनाच विचारावं लागेल.

मकबूल असो की अफझल, त्यांच्यासारखी विषवल्ली ठेचायलाच हवी. देशाच्या एकतेसाठी व अखंडत्वासाठी ते केवळ आवश्यक नव्हे, तर अनिवार्य आहे. एवढीही राजकीय समज या ‘आव्हानवीराला’ नसेल, तर त्याच्या बुध्दीची कीवच करावी लागेल.

**********************************************************************

Important Information :

रवींद्र म्हात्रे हे अत्यंत कार्यक्षम आणि शिस्तप्रिय अधिकारी होते. त्यांचं अपहरण झालं, त्या दिवशी त्यांच्या कन्येचा वाढदिवस होता. वकिलातीतून ते सायंकाळी बरोबर 5 वाजता बाहेर पडले, पण दबा धरून बसलेल्या अतिरेक्यांनी त्यांचं अपहरण केलं.पुण्यातील एका मोठया पुलाला रवींद्र म्हात्रे यांचं नाव देण्यात आलं आहे. आय.एफ.एस. अधिकाऱ्याचं नाव देण्यात आलेला हा देशातला पहिला पूल असेल. आधी त्याला रामराव आदिक यांचं नाव दिलं जाणार होतं, पण त्यांचं विमान प्रकरण भोवलं व तो निर्णय रद्द झाला. त्याच वेळी म्हात्रे यांची हत्या झाली आणि पुलाला ‘रवींद्र म्हात्रे पूल’ असं नाव देण्यात आलं. ‘आदिकांचे रोजचे स्मरण टळले’ अशी खास पुणेरी प्रतिक्रिया एका वाचकाने व्यक्त केली होती.

******************************************************************

  • Bhagwan Datar,Pune

9881065892

bhagwandatar@gmail.com


Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s