भगतसिंगांना हे चाललं असतं?

my article about Shaheed Bhagat Singh and the current situation in JNU

—————————————————–

‘सावरकरांना तुम्ही सोडलंय का?’ असला बालिश प्रश्न काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत भाजपा सदस्यांना विचारला होता. या प्रश्नाला ‘बालिश’ यासाठी म्हणायचं की, कुठलाही राष्ट्रपुरुष हा एक समूह, गट, जात किंवा पक्ष यापुरता मर्यादित राहू शकत नाही. या साऱ्यांचे अडसर उधळून टाकत तो संपूर्ण देशाचा किंवा खरं तर संपूर्ण विश्वाचा बनतो, हे ”गांधी आमचे, सावरकर तुमचे” असं म्हणणाऱ्या राहुलना माहीत नसावं. सावरकर असोत की गांधी, पटेल असोत की नेताजी – हे सारे महापुरुष एवढया अत्युच्च उंचीला पोहोचलेले असतात की त्यांच्या वाटण्या करण्यातून बालबुध्दीच प्रतीत होते. कारण विचारात आणि मार्गात कितीही मतभेद असले, तरी त्यांच्या साऱ्या आचार-विचारांचा पाया एक आणि एकच असतो – देशभक्ती! त्यांच्या मनातली राष्ट्रनिष्ठा वादातीत असते.

हे सगळं आठवलं ते शहीद भगतसिंग यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू हे विशी-बाविशीतले तरुण क्रांतिकारक (फाशी गेले तेव्हा भगतसिंग अवघ्या 23 वर्षांचे होते.) देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर चढले, तो दिवस होता 23 मार्च 1931. फासावर जाण्यापूर्वी या तिघांनीही हात मागे बांधून घेण्यास किंवा चेहरा झाकणारी काळी टोपी घालण्यास स्पष्ट नकार दिला होता. खरं तर या तिघांना दि. 24 मार्चला फाशी दिलं जाणार होतं, पण घाबरलेल्या ब्रिटिश सरकारने न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवत त्यांना एक दिवस आधीच फासावर लटकवलं. लोकांच्या रोषाला घाबरून, लाहोर तुरुंगाच्या मागच्या भिंतीला भगदाड पाडून तिथून त्यांचे मृतदेह रातोरात बाहेर काढले आणि सतलज नदीच्या काठावर, हुसेनीवाला शहराजवळ रॉकेल ओतून त्यांना अग्नी दिला. सरकारच्या या भ्याड कृत्यात ना कुठला सन्मान होता, ना कुठली मानवता.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या वीरांचं जीवन आज 85 वर्षांनंतरही तितकंच चैतन्यदायी आहे. प्रसिध्द शायर फैज अहमद फैज यांच्या ओळी या शहीदांच्या जीवनाचं तत्त्वज्ञान अगदी यथार्थपणे वर्णन करतात –

‘जिस धजसे कोई मकताल मे गया,

वह शान सलामत रहती है,

यह जान तो आनी जानी है,

इस जान की कोई बात नही।

एवढया कोवळया वयात हे अमरत्वाचं तत्त्वज्ञान भगतसिंग यांना कुणी शिकवलं असेल? फाळणीपूर्वीच्या पंजाबमधल्या एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातला हा मुलगा. ब्रिटिश राजवटीतल्या अन्यायाने तो पेटून उठला. जालियनवाला बागेतली कत्तल आणि लाला लजपतराय यांच्यावर पोलिसांनी निदर्यपणे केलेला प्राणघातक लाठीहल्ला यामुळे तो संतापला. त्याने सहकारी जमवले, हातात शस्त्र घेतलं. ब्रिटिशांना शासन करण्याची शपथ घेतली. ते असिधाराव्रत सांभाळताना आपल्या प्राणांची पर्वा न करता संघर्ष केला आणि अखेर हसत हसत आपलं जीवनपुष्प भारतमातेच्या चरणी अर्पण केलं.

क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचं गीत कदाचित भगतसिंग नेहमी गुणगुणत असावेत..

सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में हैं,

देखना है जोर कितना बाजूए कातिल में हैं ।

होश दुश्मन के उडा देंगे हमे रोको न आज,

दूर रह पाए जो हमसे, दम कहाँ मंजील में है ।

बुध्दिवादावर श्रध्दा असलेल्या भगतसिंगांना कुठलाच धर्म मंजूर नव्हता. माक्र्स, लेनिन, ट्रॉट्स्की, रसेल यांच्या तत्त्वज्ञानाने त्यांचे विचार भारलेले होते. तुरुंगात फाशीच्या आदल्या दिवशी त्यांचे वकील प्राणनाथ मेहता त्यांना भेटले. फाशीला अवघे काही तास उरलेले असतानाही भगतसिंगांनी मेहता यांच्याकडे सर्वप्रथम चौकशी केली ती आपण सांगितलेली पुस्तकं आणली की नाही याची! ‘द रिव्होल्युशनरी लेनिन’ हे पुस्तक त्यांना हवं होतं. मेहतांनी ते आणल्याचं समजताच त्यांना अतिशय आनंद झाला. मेहतांबरोबरची भेट संपताच त्यांनी ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. ‘फाशीची वेळ सरकारने 11 तास आधी आणली आहे, त्यानुसार दुसऱ्या दिवशी पहाटे 6 ऐवजी त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजता तुम्हाला फाशी देण्यात येणार आहे’ असं सांगायला तुरुंगाचा अधिकारी त्यांच्या कोठडीत आला, तेव्हा ‘तुम्ही मला एक प्रकरणसुध्दा नीट वाचू देणार नाही का?’ असं भगतसिंग थोडयाशा त्राग्याने त्याला म्हणाले. रखवालदाराच्या मागे फाशीच्या कोठीकडे जाताना भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू हे तिन्ही क्रांतिकारक त्यांचं आवडतं गीत गुणगुणत होते..

‘कभी वह दिन भी आयेगा,

के जब आझाद हम होंगे

ये अपनी ही जमीन होगी

ये अपना आसमाँ होगा

शहीदोंके चिताओंपर

लगेंगे हर बार यहाँ मेले

वतनपर मरनेवालोंका

यहीं नामोनिशाँ होगा ।

(केव्हातरी तो दिवस नक्की येईल, ज्या दिवशी आम्ही स्वतंत्र झालेलो असू. त्या वेळी ही जमीन आमची असेल आणि हे आकाशही आमचे असेल. जिथे हुतात्म्यांच्या चिता पेटल्या त्या जागी सगळे जमतील आणि मातृभूमीसाठी प्राणांचं बलिदान करणाऱ्यांना श्रध्दांजली वाहतील.)

भगतसिंगांना त्यांची अखेरची इच्छा विचारली गेली, तेव्हा ते शांत पण निश्चयी स्वरात म्हणाले, ”मला याच देशात पुन्हा जन्म घ्यायचाय; म्हणजे मला देशाची सेवा पुन्हा करता येईल.”

भगतसिंग विचारांनी नास्तिक होते. फाशी देण्यापूर्वी ”तुम्ही वाहे गुरूची प्रार्थना करा” असं तिथल्या वॉर्डन चरतसिंग याने सुचवलं, तेव्हा भगतसिंग त्याला म्हणाले, ”माझ्या आयुष्यात मी एकदाही प्रार्थना केली नाही. उलट लोकांच्या दैन्यावस्थेबद्दल आणि दु:खाबद्दल मी देवाला दूषणंच दिली. आता जर मी प्रार्थना केली, तर तो म्हणेल, ”बघा, हा भित्रा माणूस! याचा शेवट जवळ आलाय म्हणून माझी प्रार्थना करतोय!”

देव, धर्म, रूढी, परंपरा असल्या कुठल्याच गोष्टींवर भगतसिंगांची श्रध्दा नव्हती. त्यांचे सारे आदर्श डाव्या विचारसरणीचे होते. गरीब किसानांना, कामगारांना स्वातंत्र्यांचा फायदा मिळावा एवढंच त्यांचं साधं, सरळ तत्त्वज्ञान होतं.

या एकाच आधारावर आजचे डावे विचारवंत आणि राजकीय नेते आणि उद्याचे ‘लाल तारे’ भगतसिंगांना डाव्या विचारसरणीतच अडकवू पाहतात. त्यांच्या उत्तुंगतेवर विचारांच्या मर्यादांचं कुंपण घालतात.

पण, भगतसिंगांच्या साऱ्या तत्त्वज्ञानाच्या मुळाशी त्यांचं मातृभूमीविषयीचं नितांत प्रेम होतं, हे नजरेआड कसं करता येईल? स्वामी रामतीर्थ आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचाही त्यांच्यावर प्रभाव होता. म्हणूनच क्रांतिकारकांचे ज्येष्ठ मार्गदर्शक भगवतीचरण व्होरा यांची पत्नी दुर्गादेवी यांच्याशी चर्चा करताना त्यांनी सहजच स्वामी रामतीर्थ यांच्या ओळी उद्धृत केल्या –

हम रूखे टुकडे खायेंगे, भारतपर वारे जायेंगे

हम सूखे चने चबायेंगे, भारत की बात बनायेंगे,

हम नंगे उमर बितायेंगे, भारतपर जान मिटायेंगे ।’

भगतसिंगांशी केवळ आपलंच नातं आहे, असा दंभ मिरवणाऱ्या आजच्या करात-येचुरी-कन्हैय्या प्रभावळीतल्या डाव्यांना कुणीतरी याची आठवण करून दिली पाहिजे.

‘भारत की बरबादी तक जंग रहेगी, जंग रहेगी’ किंवा ‘भारत के टुकडे होंगे, इन्शाल्ला, इन्शाल्ला!’ असल्या घोषणा भगतसिंगांना चालल्या असत्या? ज्याच्यासाठी प्राणांची आहुती द्यायची, त्या देशालाच सुरुंग लावू पाहणाऱ्यांचे चाळे भगतसिंगांनी सहन केले असते?

डावे ज्यांना शत्रू मानतात, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र भगतसिंगांची पुण्यतिथी विसरले नाहीत. गेल्या वर्षी 23 मार्च 2015 रोजी मोदींनी हुसेनीवाला स्मारकाला भेट देऊन तिन्ही क्रांतिकारकांना अभिवादन केलं. भगतसिंगांच्या नावाने तंत्रशिक्षण महाविद्यालयाची घोषणा केली. ”भगतसिंग या शब्दात असं सामर्थ्य आहे की, त्याच्या उच्चाराने देशाच्या कानाकोपऱ्यात चैतन्याची लाट उसळते” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

देशाच्या महापुरुषांना विचारांच्या पिंजऱ्यात बंदिस्त करायचं नसतं, हे नरेंद्र मोदींनी कृतीने दाखवून दिलं; हे सहजपणे लक्षात यावं एवढी समज सध्या डाव्यांच्या कळपात वावरणाऱ्या राहुल गांधी यांना नाही. पण लक्षात आलंच तर सावरकरांविषयी वाटेल ते बरळण्याऐवजी ‘भगतसिंगांचं मातृभूमीवरील प्रेम विसरू नका’ असा सल्ला त्यांनी जे.एन.यू.मधल्या कन्हैय्या आणि गोपींना द्यायला हरकत नाही. भगतसिंगांना तीच सकारात्मक श्रध्दांजली ठरेल!

  • भगवान दातार

  • Bhagwan Datar, Pune

  • 9881065892

  • bhagwandatar@gmail.com

(You can also read by blog on Saptahik Vivek’s website here)

धर्म न मानणाऱ्या भगतसिंगांनी हिंदू-मुस्लीम असा भेद कधीच केला नाही. मात्र भारतद्वेषाने पछाडलेल्या पाकिस्तानने भगतसिंगांनाही सोडलं नाही. भारत-पाकिस्तान सीमेवर फेरोजपूर जिल्ह्यातील हुसेनीवाला इथे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. आपली बारा गावं देऊन सतलज नदीच्या तीरावरची ती जागा भारताने पाकिस्तानकडून घेतली. मात्र 1965च्या युध्दात प्रचंड फौजेनिशी पाकिस्तानने हुसेनीवालावर हल्ला केला. त्या वेळी मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या जवानांनी प्राणपणानं हे स्मारक जपलं. इन्फन्ट्रीच्या लेफ्टनंट के.एम. पलांडे, लेफ्ट. एस. देशपांडे, लेफ्ट. फिरोज डॉक्टर या मराठी जवानांनी असीम शौर्य दाखवलं. त्या वेळचे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी बटालियनमध्ये जाऊन या जवानांचा गौरव केला. 1971मध्ये पुन्हा पाकिस्तानने या स्मारकांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त केलं. तिथले भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे पुतळे पळवले. मेजर एस.पी.एस. वारियावा यांना पळवून नेलं आणि युध्दकैदी बनवलं. नंतर तिकडेच तुरुंगात त्यांना ठार मारलं. पाकिस्तानच्या या अघोरी कृत्यांचा जे.एन.यू.मध्ये कधी निषेध झालाय? ‘भगतसिंग फक्त आमचेच’ म्हणणाऱ्या डाव्यांच्या त्या त्या वेळच्या कृष्ण कन्हैय्यांनी जे.एन.यू.मध्ये एखादीतरी निषेध सभा घेतलीय? माध्यमांमधल्या डाव्या नरपुंगवानी या मुद्दयावर कधी आकाश-पाताळ एक केलंय?

Leave a comment